पुणे : ‘वंदे मातरम’, भारत माताकी जय’, ‘आणीबाणी रद्द करा’ अशा घोषणा देत सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील 16 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी 11 डिसेंबर 1975 रोजी महाविद्यालयाच्या आवारात आणीबाणीविरोधात सत्याग्रह केला. आणीबाणीच्या कालखंडात शहरातील विद्यार्थी वर्गात झालेला हा पहिला सत्याग्रह असून त्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यातील 16 जणांपैकी नऊ जण महाविद्यालयाच्या आवारात एकत्र येऊन तेव्हा केलेल्या आंदोलनाच्या आठवणी जागवल्या. आणीबाणीच्या आठवणी जागवण्यासाठी आलेल्या या साऱ्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्वागत स.प.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील आणि उपप्राचार्य डॉ. विद्या अवचट यांनी केले.
श्रीधर मधूकर उर्फ राजा दीक्षित यांच्या नेतृत्त्वाखाली तेव्हा स. प. महाविद्यालयात शिकत असणाऱ्या कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसह बाहेरच्या महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनीही त्यात सहभाग घेतला होता. त्यामध्ये अरविंद वसंत शिराळकर, चंद्रशेखर प्रभू हिरेमठ, विवेक कृष्णराव सबनीस, मोरेश्वर कृष्णाजी मांडके, श्रीकांत भास्कर केळकर, अनिल अवधूत पेंडसे, आनंद गजानन केळकर, विश्वास हरी जोशी, प्रदीप केशव भट, मिलींद माधव कसबेकर आणि मुकेश माधव कसबेकर यांच्यासह भारती कुलकर्णी-ठुसे आणि सुनिता पुराणिक-गोडबोले या विद्यार्थिनींचाही सक्रिय सहभाग होता.
देशात पुकारलेल्या आणीबाणीचा निषेध करत या विद्यार्थी विद्यार्थिनींनी घोषणा दिल्या तर राजा दीक्षित यांनी आणीबाणी कशी चुकीची आहे हे सांगणारे भाषणही तेव्हा केले होते. तेव्हाच्या विश्रामबाग ठाण्याच्या पोलिसांनी कॉलेजच्या आवारात येऊन या साऱ्या आंदोलनकर्त्यांना अटक केली आणि घोषणा देत हे सारे विद्यार्थी पोलिस व्हॅनमध्ये बसले. त्यांना आधी विश्रामबाग ठाण्यात नेऊन तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी उशीरा साऱ्यांची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात दीड महिन्यांच्या कारावासाठी झाली.
या नऊ आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी माधव कापरे, विजय गोवंडे आणि मैत्रेयी कसबेकर यावेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा