पुणे : संशोधन ही अनेक वर्षांच्या तपश्चर्या, संघर्ष आणि त्यागातून घडणारी प्रक्रिया असून दैनंदिन जीवनातील विविध वस्तू सहज उपलब्ध होण्यासाठी संशोधकांनी केलेल्या कष्टांमागे मोठा इतिहास दडलेला आहे. चिल्ड्रन्स डे, फादर्स डे, मदर्स डे, व्हॅलेंटाइन डे असे विविध दिवस साजरे होत असताना जीवनमान उंचावण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या संशोधकांचा गौरव करण्यासाठी १० डिसेंबर हा दिवस 'संशोधक दिन किंवा शास्त्रज्ञ दिन' म्हणून घोषित करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. ही मागणी रँचो (Researcher and Naturally Clever Human Organization) आणि DICCAI (दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) चे संस्थापक रघुनाथ येमुल गुरुजी यांनी पत्राद्वारे केली आहे.
२०१३ पासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून जागतिक स्तरावर संशोधकांना सन्मान मिळावा या उद्देशाने ही मोहीम सुरू आहे. येमुल गुरुजीं म्हणाले,१० डिसेंबर रोजी जगभरातील संशोधकांना नोबेल पुरस्कार दिले जातात आणि याच दिवशी १९३० मध्ये भारताचे शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमन यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे या तारखेला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच २१ नोव्हेंबर हा डॉ. रमन यांचा स्मृतिदिन असल्याने या दोन तारखांपैकी एक दिवस “संशोधक दिन किंवा शास्त्रज्ञ दिन” म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात २१ नोव्हेंबर किंवा १० डिसेंबर यापैकी एक दिवस “Researchers & Innovators Day” म्हणून घोषित करण्याची विनंती करण्यात आली आहे. डॉ. रमन यांचे योगदान, रमन इफेक्टचा जागतिक स्वीकार आणि संशोधकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करून या दिवसामुळे विज्ञान, नवोन्मेष, स्टार्टअप संस्कृती आणि युवा संशोधकांना प्रोत्साहन मिळेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. संशोधकांना मिळणारा सन्मान म्हणजे भारताच्या प्रगतीसाठी आवश्यक पाऊल असल्याचेही पत्रात सांगितले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने