- 'क्रांतिसूर्य सावित्रीज्योति पुरस्कार' रोकडे दांपत्यास जाहीर; संविधान दिनानिमित्त आयोजन
पुणे: विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समिती, काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन या संस्थांच्या वतीने संविधान दिनानिमित्त एक दिवसीय 'आम्ही सावित्रीच्या मायलेकी' या महाकाव्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संविधान दिनानिमित्त आयोजित हे काव्यसंमेलन मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे सरचिटणीस प्रा. शंकर आथरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी संमेलनाध्यक्षा संगीता झिंजुरके, स्वागताध्यक्ष सीमा गांधी, प्रा. भारती जाधव आणि प्रा. सायली गोसावी उपस्थित होते.

प्रा. शंकर आथरे म्हणाले, "संमेलनात दिला जाणारा 'क्रांतीसूर्य सावित्रीज्योति पुरस्कार' यंदा बंधुता चळवळीत गेल्या ५१ वर्षांपासून योगदान देणाऱ्या मंदाकिनी आणि बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांना जाहीर करण्यात आला आहे. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील कन्या महाविद्यालयास 'ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले ज्ञानसाधना पुरस्कार' प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ साहित्यिका आणि विचारवंत डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे."

संविधान दिनाच्या औचित्याने संमेलनामध्ये 'संविधान सन्मान आदर्श पत्रकारिता पुरस्कार' प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये महिमा ठोंबरे (सकाळ), नम्रता फडणीस (लोकमत), सुवर्णा चव्हाण (पुढारी), कल्पना खरे-साठे (केसरी), मेधा पालकर (सामना), प्रीती पाठक (भास्कर), अर्चना मोरे (पुणे मिरर), कल्याणी फडके (महाराष्ट्र टाइम्स), शिवानी पांढरे (एबीपी माझा), गजाला सय्यद (शबनम न्यूज), वनिता चौधरी (साहित्यलीला पंढरी), सायली नलावडे-कविटकर (सहस्त्रजीत मीडिया) यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे संमेलनाध्यक्षा संगीता झिंजुरके यांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सविता पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. दुपारी ज्येष्ठ कवयित्री प्रिया माळी यांच्या अध्यक्षतेखाली 'सावित्रीची काव्यफुले' काव्यसंमेलन होईल. त्यामध्ये तीसहून अधिक प्रतिथयश कवयित्री सहभागी होतील. संमेलनामध्ये सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार, आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कारांचे वितरण होईल. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत रोकडे परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने