ओरिगामीच्या कागदी कलाकृती वेधून घेतायेत कलाप्रेमींचे लक्ष


पुणे : कागदाच्या असंख्य घड्यांमधून साकारलेल्या अनेकविध कलाकृती, कागदातून साकारलेले अष्टविनायक, विविध प्रकारची कागदी फुले, कलाकृती, प्राणी, पक्षी पाहण्याची संधी पुणेकरांना आजपासून उपलब्ध झाली आहे. निमित्त आहे इंदुताई टिळक कला केंद्र व ओरिगामी मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘वंडरफोल्ड २०२५’ या ओरिगामी कला प्रदर्शनाचे. सदर प्रदर्शनाला आजपासून टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे सुरुवात झाली. हे वर्ष या प्रदर्शनाचे १८ वे वर्ष असून रविवार दि. २ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
आज टिळक विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गिताली टिळक यांच्या हस्ते प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन संपन्न झाले. डॉ. दीपक टिळक यांचे सुपुत्र रोहित टिळक, सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना व अभिनेत्री शर्वरी जमेनीस, बरीसिक कजुको, मोकातो साटो, ओरिगामी मित्रच्या स्वाती धर्माधिकारी, मिलिंद केळकर, रजनी देवल व ओरिगामी मित्रचे अनेक स्नेही यावेळी उपस्थित होते.
ओरिगामीचा वारसा मला माझी आजी इंदुताई टिळक यांच्याकडून मिळाला. पण माझा एकूणच कल हा इकेबाना या कलेकडे असल्याने ओरिगामी मागे पडत गेलं. ओरिगामी या जपानी कलेचा भारतात प्रचार प्रसार व्हावा अशी माझ्या आजीची खूप इच्छा होती, यासाठी तिने प्रदर्शने भरविली, समविचारी कलाकारांना एकत्र आणत अनेक उपक्रम राबविले. त्याकाळी ओरिगामी कसे करावे या विषयीची पुस्तकेही जपानी भाषेतच होती, ती पुस्तके तिने भाषांतरीत करून मराठी भाषेत आणली. अशा आठवणी डॉ. गीताली टिळक यांनी सांगितल्या. स्वत:चा काहीही फायदा नसतानाही या कलेसाठी हौसेने एकत्र आलेले कलाकार ओरिगामी मित्रच्या व या प्रदर्शनाच्या माध्यमातून पहायला मिळतात याचे एक वेगळेच समाधान असल्याचे डॉ. टिळक यांनी सांगितले.
माझा मुलगा फक्त एकदा ओरिगामी बघायला आला आणि त्याला ते आवडलं. त्यानंतर तो ओरिगामी करू लागला. मला वाटलं याचा उत्साह फार तर फार एक दोन महिने टिकेल पण आज तो पाच पाच तास बसून ओरिगामी करतो. कलेची बाजू त्याला ओरिगामीमधून गवसली याचा मला आनंद आहे. आज ओरिगामी मित्रचे सदस्य करीत असलेले या कलेच्या प्रचार प्रसाराचे काम मला महत्त्वाचे वाटते, असे शर्वरी जमेनीस म्हणाल्या.
जपानी पारंपरिक कलेचा एक भाग म्हणून आज जग ओरिगामीला ओळखते. या कला प्रकाराची माहिती भारतीयांना व्हावी, या उद्देशाने पुण्यात इंदुताई टिळक, विश्वास देवल आणि अनिल अवचट यांनी ९० च्या काळात ओरिगामी मित्र हा जपानी कलेचा छंद असणाऱ्या मंडळींचा ग्रुप सुरु केला. मागील ३५ वर्ष दोन वर्षातून एकदा अशा पद्धतीने पुण्यात ‘वंडरफोल्ड’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते असे ओरिगामी मित्रचे मिलिंद केळकर म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने