पुणे : पदवीधर मतदारसंघातील विद्यमान मतदार नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी, पुनर्नोंदणीच्या सक्तीमुळे निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या सुधारणा मागण्यांविषयी अधिक माहिती देण्यासाठी महाराष्ट्र युवा महासंघाचे अध्यक्ष व समता परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सुदर्शन घेरडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी “पदवीधर मतदारांसाठी एकदाच कायमस्वरूपी नोंदणी प्रणाली लागू करण्याची” मागणी केली असून, या संदर्भात बॉम्बे हायकोर्टात सार्वजनिक हित याचिका (PIL) दाखल केल्याची माहिती दिली.
डॉ. घेरडे म्हणाले, “पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रियेत असलेल्या त्रुटींमुळे सुशिक्षित नागरिकांचा मोठा वर्ग मतदानापासून वंचित राहत आहे, ज्यामुळे लोकशाहीतील समान मतदान हक्काचे (कलम ३२६) उल्लंघन होत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने सुधारण्याची गरज आहे.”पुणे पदवीधर मतदारसंघात (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) २०१९ मध्ये ५.९१ लाख मतदार नोंदणीकृत होते. दरवर्षी सरासरी १० टक्के वाढ गृहीत धरली तरी २०२५ मध्ये ही संख्या ६.५ लाखांपर्यंत जावी, मात्र प्रत्यक्ष पात्र पदवीधरांची संख्या १२ ते १५ लाखांच्या दरम्यान आहे. म्हणजेच सुमारे अर्धे सुशिक्षित नागरिक मतदानापासून वंचित आहेत. सध्याची ३६ दिवसांची नोंदणी मोहीम अत्यंत अपुरी असून, ५ जिल्ह्यांतील ६३ सहाय्यक निवडणूक अधिकारी, ५८४ प्राधिकृत अधिकारी आणि १२२ अतिरिक्त अधिकारी एवढ्या मर्यादित मनुष्यबळावर लाखो अर्ज हाताळणे अव्यवहार्य ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा