नवरात्रीच्या दहा दिवसात शिवसृष्टीत अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन
पुणे: आंबेगाव बुद्रुक येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने निर्माणाधिन असलेल्या शिवसृष्टीमध्ये देवीचा जागर रंगणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त व शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी कळविली आहे. नवरात्रोत्सवात सायंकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान संपन्न होणारे हे सर्व कार्यक्रम शिवसृष्टीमधील भवानी माता मंदिराच्या प्रांगणात होणार असून त्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येईल, असेही कदम यांनी सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना जगदीश कदम म्हणाले, “माता तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवी आहे. शिवसृष्टी प्रकल्पात प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आपण साकारली आहे. त्यामुळे देवीचा हा उत्सव साजरा करण्याकरीता प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहोत.”
नवरात्रीच्या या दहा दिवसांत भक्तीगीत, भजने, भक्तीरंग, ध्वज पथक, भक्तीरस, स्तोत्र व देवीची गाणी, ‘नाम रंगी रंगुनी’ हा कार्यक्रम, देवीचा गोंधळ या कार्यक्रमांचा समावेश आहे. स्वामी शरण भक्ती मंडळ, श्रुतीलय, नाद सप्तक संगीत विद्यालय, स्वरूप वर्धिनी गृप, आंबेगाव भजनी मंडळ, मिहिका ग्रुप, जानकी नवरात्र गृप, मंदार पंडित गृप, आरव ग्रुप, गायकवाड ग्रुप या पुण्यातील विविध संस्था या कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. यादरम्यान अष्टमीला होणारा हवनाचा कार्यक्रम विशेष असून या अंतर्गत पुण्य वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, देवेतेचे स्थापन, ब्रह्मादीमंडल स्थापन, आदित्यादी नवग्रह मंडळ आणि रुद्र कलश यांची स्थापना करून होम करण्यात येईल अशी माहितीही कदम यांनी कळविली आहे.
टिप्पणी पोस्ट करा