पुणे – भारत फोर्ज लिमिटेड (बीएफएल) हा भारतातील सर्वात मोठा फोर्जिंग व प्रगत अभियांत्रिकी क्षेत्रातील समूह, आणि विंडरेसर्स लिमिटेड ही जड भार वाहू शकणाऱ्या, दुहेरी वापरण्यायोग्य अत्याधुनिक ड्रोनची निर्मिती करणारी युनायटेड किंगडममधील कंपनी, या दोघांनी विंडरेसर्स अल्ट्रा हे मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) भारतात सादर करण्यासंदर्भात आपसांत एक सामंजस्य करार केला आहे. ‘यूएव्ही’चे तैनातीकरण, स्थानिकीकरण व वापर यांवर एकमेकांशी सहकार्य करण्यासाठी हा करार झाला आहे. लंडन येथे झालेल्या ‘डीएसईआय यूके २०२५’ या प्रदर्शनात या करारावर शिक्कामोर्तब झाले.


भारत व युके यांच्यातील मुक्त व्यापार करारान्वये दोन्ही देशांमध्ये एअरोस्पेस क्षेत्रातील तंत्रज्ञान हस्तांतरण व नवोन्मेष वाढविण्याच्या हेतूने ही भागीदारी दोन्ही कंपन्यांनी केली. ‘इंडिया-यूके व्हिजन २०३५’ या धोरणाशी ही भागीदारी सुसंगत आहे. हा करार सध्या तरी दोन वर्षांच्या कालावधीसाठीचा असून, त्याअंतर्गत स्थानिकीकरण वाढविणे, संयुक्त चाचण्या घेणे आणि भारतातील प्रत्यक्ष तैनातीसाठी अंतिम कराराची रूपरेषा तयार करणे याची संधी दोन्ही कंपन्यांना मिळेल.


‘अल्ट्रा’च्या क्षमतांचा वापर करून भारताच्या लष्करी तसेच नागरी क्षेत्रातील नव्या गरजा पूर्ण करण्याचा भारत फोर्ज आणि विंडरेसर्स यांचा मानस आहे. भारतीय नौदलासाठी कॅरिअर ऑन बोर्ड डिलिव्हरी (सीओडी) मोहिमा, लष्कर व वायुदलासाठी अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची व्यवस्था आणि विविध कार्यस्थितींमध्ये इतर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या ‘अल्ट्रा’च्या सहाय्याने पार पाडता येतील, असा विश्वास या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

'भारत फोर्ज’चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी या भागीदारीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “भारत-युके मुक्त व्यापार करारामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणात ‘विंडरेसर्स’सोबत भागीदारी करण्यास आम्हाला आनंद वाटतो. भारताच्या स्वदेशी मानवरहित विमान (यूएव्ही) क्षमतेला ‘विंडरेसर्स अल्ट्रा’ हे अधिक बळकट तर करतेच, पण अत्यंत कठीण भूभागांमध्ये उच्चस्तरीय लॉजिस्टिक्ससाठी ठोस उपाययोजना उपलब्ध करून देते. आपल्या उद्योग क्षेत्रात अल्ट्राची वहनक्षमता सर्वात जास्त आहे. त्याची खरी कार्यक्षमता जास्त उंचीवरील भूभाग, समुद्री आणि दुर्गम भागांत सिद्ध झालेली आहे. त्यामुळे अल्ट्रा हे वाहन नौदल, वायुदल आणि लष्कर या तिन्ही सैन्यदलांच्या गरजांसाठी अगदी उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्हाला तिन्ही दलांमध्ये सेवा उपलब्ध करून देता येईल, तसेच भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने आखलेल्या १५ वर्षांच्या आराखड्याशीही सांगड घालता येईल. या आराखड्यात मानवरहित लॉजिस्टिक्स, नौदल मोहिमा, उंचावरील पुरवठा साखळी व दुहेरी उपयोगाच्या तंत्रज्ञान यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे.”
आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये, विशेषतः अंटार्क्टिक संशोधन मोहिमांना सातत्याने दिलेल्या मदतीतून ‘विंडरेसर्स अल्ट्रा’ने आपली बहुउद्देशीय क्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध केली आहे. भारतातही धोकादायक व दुर्गम प्रदेशांमध्ये हे तंत्रज्ञान सुरक्षित व कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित करून तितकेच महत्त्वाचे लाभ देईल, अशी अपेक्षा आहे.

‘विंडरेसर्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सायमन मडेरॅक या प्रसंगी म्हणाले, “विंडरेसर्स अल्ट्राच्या दुहेरी वापराच्या कार्यपद्धतीचा विस्तार करण्यामध्ये भारत फोर्जसोबतची भागीदारी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या सहकार्यामुळे ‘अल्ट्रा’च्या संशोधन, विकास, चाचण्या व प्रत्यक्ष संचालनातील अनेक वर्षांचा अनुभव उपयोगात आणता येईल आणि भारताच्या संरक्षण व नागरी क्षेत्रासाठी धोरणात्मक फायदे तसेच कार्यात्मक स्वायत्तता मिळेल.”

‘विंडरेसर्स अल्ट्रा’मध्ये अत्याधुनिक मिशन कंट्रोल व ऑटोपायलट प्रणालीचा वापर करण्यात आला असून ते सलग सहा ते सात तासांच्या दीर्घ मोहिमांसाठी डिझाइन केलेले आहे. भारताच्या समुद्री व बेटांवरील प्रदेशांपासून हिमालयातील उंच डोंगराळ भागापर्यंत आणि ईशान्य भारतातील दुर्गम क्षेत्रांपर्यंत विविध वातावरणात कार्यक्षमतेने काम करण्यासाठी त्याची रचना व निर्मिती करण्यात आली आहे.

भारत फोर्ज आणि विंडरेसर्स यांच्या व्यापक एअरोस्पेस वृद्धी धोरणाशी हा करार सुसंगत आहे. भारतात यूएव्ही क्षमतांचा, नवनवीन कल्पनांचा विकास करणे, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करून संरक्षण क्षेत्रात एअरोस्पेसचा उपयोग होऊ देणे, यांस चालना देण्याचा या कराराचा उद्देश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने