पुणे: सध्या डिजिटल जगात पुस्तकांच्या परंपरेवर, त्यांच्या अस्तित्वावर शंका घेतली जाते. प्रत्यक्षात मात्र पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसते. पुस्तकांची विक्री करणारी दुकाने आणि त्यांची वाढणारी संख्या पाहिली की, पुस्तके संपतील याविषयी काळजी करण्याचे कारण नाही, असे लक्षात येते. वाचकांचा ओढा पुस्तकांकडे दिवसेंदिवस वाढतोच आहे. पुस्तके नेहमीच टिकून राहतील, असे मत प्रसिद्ध कवी सौमित्र अर्थात अभिनेते किशोर कदम यांनी व्यक्त केले.


अक्षरधारा आणि राजहंस प्रकाशनाच्या वतीने टिळक रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित पुस्तकांच्या मान्सून महोत्सवाचे उद्घाटन आज सौमित्र यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. २० जुलैपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.यावेळी व्यासपीठावर पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक आणि ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’चे विश्वस्त राजेश पांडे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ‘राजहंस’चे संपादक शिरीष सहस्त्रबुद्धे, ‘अक्षरधारा’चे रमेश राठिवडेकर, रसिका राठिवडेकर उपस्थित होते. याच कार्यक्रमात कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनी पुस्तकांवरील कवितांचे वाचन केले.
किशोर कदम म्हणाले, मी महिन्यातून दोन वेळा पुस्तकांच्या दुकानात जातो. नवे पुस्तक विकत घेतो. उत्सुकतेपोटी विकत घेतलेली पुस्तके आपण लगेच वाचतो असे होत नाही. मात्र, कधी तरी वाचण्याच्या उद्देशाने पुस्तक घेत असतो. पुस्तकांचे प्रदर्शन भरणे आता दुर्मिळ झाले आहे. अक्षरधाराचे हे ६०६ वे प्रदेश आहे, ही अभिमानाची बाब आहे.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले , उत्तम ग्रंथ प्रदर्शनाबरोबर व्याख्याने, कार्यक्रम यांचे आवर्जून आयोजन करणारी अक्षरधारा ही दुर्मिळ संस्था आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसिका राठिवडेकर यांनी केले. सिद्धार्थ बेंद्रे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने