पुणे : जहांगीर रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेत कौशल्य दाखवत ६८ वर्षीय महिलेच्या शरीरातून तब्बल १८ किलो वजनाचा अंडाशयातील ट्युमर (गाठ) यशस्वीपणे बाहेर काढला. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली. बिहारमधील ही रुग्ण महिला आधीच स्तनाच्या कर्करोगातून बरी झालेली होती. गेल्या काही महिन्यांपासून तिला पोट फुगणे व सततची अस्वस्थता जाणवत होती. प्राथमिक तपासणीत तिच्या अंडाशयात मोठी गाठ असल्याचे निदान झाले. या निदानात ट्युमर मार्कर सामान्य श्रेणीत असले तरी गाठीचे स्वरूप स्पष्ट झाले नव्हते.
यामुळेच पुढील उपचारासाठी या रुग्ण महिलेने पुण्याचे जहांगीर रुग्णालय गाठले. जहांगीर रुग्णालयातील वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीना मनसुखानी आणि वरिष्ठ ऑन्कोसर्जन व ऑन्को सायन्सेसचे संचालक डॉ. सी. बी. कोप्पीकर यांच्या नेतृत्वाखाली जहांगीर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या बहुविध वैद्यकीय पथकाने या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा आढावा घेतला व सखोल नियोजनानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
ही केस अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेणारी होती आणि प्रत्येक टप्प्यावर अचूक नियोजन आवश्यक होते. तसेच या प्रक्रियेत कर्करोगाची शक्यता लक्षात घेऊनच आम्ही तयारी केली होती, अशी माहिती डॉ. मनसुखानी यांनी दिली.शस्त्रक्रियेच्या दरम्यान डॉक्टरांना या रुग्ण महिलेमध्ये ४४ x ३७ x ३० से.मी. आकाराची गाठ सापडली. या गाठीमध्ये सुमारे १६ लिटर द्रव होता. तर या गाठीचे एकूण वजन सुमारे १८ किलो होते. शस्त्रक्रियेच्या दरम्यान करण्यात आलेल्या फ्रोजन सेक्शन बायोप्सीत या गाठीचे स्वरूप ‘बॉर्डरलाइन ओव्हेरियन म्युसिनस सिस्टाडेनोमा’ असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच या गाठीमध्ये कर्करोग असण्याची शक्यता कमी असते. शिवाय पूर्वसंमतीनुसार या महिलेला गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रियाही करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने लवकरच सुधारणा दर्शवली. तर १० दिवसांत तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर तिचे वजन ११६ किलोवरून सुमारे ९६ किलोपर्यंत घटले.
डॉ. कोप्पीकर यावेळी म्हणाले की, या रुग्णावरील यशस्वी वैद्यकीय शस्त्रक्रिया ही एक आदर्श नैतिक व रुग्णकेंद्री उपचारपद्धतीचे उत्तम उदाहरण आहे. शिवाय रुग्णाचे वय, कर्करोगाचा पूर्वेतिहास यांचा विचार करता, या रुग्णाची शस्त्रक्रिया यशस्वी होणे म्हणजे जहांगीर रुग्णालयातील बहुविध वैद्यकीय पथकाचे संयमित नियोजन, एकत्रित कार्य व वैद्यकीय दक्षतेचे फलित आहे.
टिप्पणी पोस्ट करा