मुंबई येथे १ ते ४ मे रोजी जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट
पुणे,दि. 27(प्रतिनिधी ) ः जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट (वेव्ज्) चे आयोजन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केले आहे. यंदा ही परिषद मुंबई येथे १ ते ४ मे रोजी, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (बीकेसी) येथे आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती आकाशवाणी पुणे चे डेप्युटी डायरेक्टर जनरल अधिर गडपाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी वृत्त विभागाचे प्रमुख माधव जायभाय उपस्थित होते.
डेप्युटी डायरेक्टर जनरल अधिर गडपाले म्हणाले की,जागतिक मीडिया आणि मनोरंजन उद्योगात भारताची स्थिती उंचावणे हा या परिषदेचा उद्देश आहे. या परिषदेसाठी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीज्(फिक्की) भागीदार आहे. या परिषदेत जागतिक मीडिया संवाद, खरेदीदार-विक्रेता बैठका, युवा निर्मात्यांसाठी पिचिंग संधी, उद्योन्मुख डिजिटल कथाकथन प्रकारांचे प्रदर्शन तसेच विविध विषयांवरील प्रदर्शने भरविण्यात येतील. या परिषदेसाठी पाच हजार हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
प्रसार भारती ने वेव्हज् हे ऍप देखील विकसित केले आहे. दहा लाखांहून अधिक जणांनी वेव्हज् हे ऍप डाऊनलोड केले आहे. आकाशवाणी पुणे केंद्र देखील या ऍप वर उपलब्ध आहे. मनोरंजन, शैक्षणिक सामग्री आणि ई-कॉमर्स संबंधीची माहिती देण्यासाठी हे ऍप विकसित करण्यात आले आहे. हे ऍप हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी, तमिळ, तेलगु, कन्नड, गुजराती, पंजाबी, आसामी अशा एकूण १२ भाषांमध्ये उपलब्ध आहे. माहिती, मनोरंजन, बातम्या, संस्कृती, पौराणिक कथा, भक्तिगीते, रिऍलिटी शो, इतिहास, शिक्षण,लोककथा, क्रीडा आदींसंबंधीची माहिती ऍपवर उपलब्ध आहे. दूरदर्शनच्या रामायण, महाभारत, शक्तिमान या सारख्या गाजलेल्या मालिकांही या ऍपवर पाहायला मिळतील. अशीही माहिती आकाशवाणी पुणे चे डेप्युटी डायरेक्टर जनरल अधिर गडपाले यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा