शंकर बाबा हात जोडीतो घ्या मज पदरात
शंकर बाबा हात जोडीतो घ्या मज पदरात
अष्टवक्र अजानुबाहू ठेवा शिरी हात ॥
चारीधामही मलाच दिसती तुझ्याच चरणासी कशास जावे हा मठ सोडोनी तिर्थक्षेत्रासी ॥
हिमालयातील चारधाम यात्रा करून ज्या आनंदाला आणि समाधानाला भक्त प्राप्त होतात, तोच आनंद आणि समाधान फक्त शंकरमहाराज समाधी दर्शनाने मिळते असा दृढ विश्वास भक्तांचा आहे.
लाखो शंकर भक्त ज्या समाधी सोहळ्याची अतुरतेने वाट पहात असतात तो ७८ वा समाधी सोहळा दि. २८ एप्रिल ते ५ मे २०२५ दरम्यान शंकर महाराज समाधी मठात साजरा होत आहे.
खरतर शंकर महाराज हे हिमालयातील योगी पण सामान्य जनांची दुःख हलकी करण्या करता महाराज पुन्हा संसारी परतले. अष्टसिद्धी प्राप्त असल्याने देहधारी जिवनात असंख्य चमत्कार करून अंहकारमुक्त जिवन जगल्याने आनंदाला कसे प्राप्त व्हावे हे शंकर महाराजांनी भक्तांना शिकवले. अहंकार विसर्जीत केला की जिवन भयमुक्त आणि आनंदी होते.
भजन किर्तनाने चित्त शुद्ध करणे, भुकेलेल्या अन्न देणे आणि दिनदुबळ्यांची सेवा करणे हा समाधिस्त शंकर महाराज भक्तीचा खरा गाभा आहे.
१९६९ साली तत्कालीन भक्तांनी एक होऊन श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट या नावे विघीविहीत न्यासाची स्थापना केली.
न्यासाच्या नावातच शंकर महाराजांची खरी ओळख होते.
सद्गुरू म्हणजे केवळ सत्याच्या मार्गावरून चांगले ज्ञान देणारा किंवा मार्गदर्शन करणारा गुरू नव्हे तर आत्म ज्ञान आणि आत्म- साक्षात्कार घडवून आणणारा असतो. तेंव्हा सद्गुरू देहाच्या पलीकडले असतो. शंकर महाराज आज समाधिस्त आहेत तरी पण महाराजांचे व्यापक आत्मिक अस्तित्व भक्तांना जाणवत आहे म्हणूनच समाधी पश्चातही ते साधकांना आत्म- साक्षात्काराच्या मार्गाकडे घेऊन जात आहेत.
याचसाठी शंकरमहाराज गुरू नाहीतर सद्गुरू आहेत.
संतवर्य म्हणजे श्रेष्ठ संत नव्हे तर प्रतिष्ठित आणि महान संत ज्यांनी आध्यात्मिक व नैतिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान केलं आहे.
शंकर महाराजांच्या देहधारी जिवनात ज्या भक्तांना त्यांचं सानिध्य लाभल अशा अनेक भक्तांनी महाराजांच्या आध्यात्मिक बैठकीवर त्यांचे अनुभव लिहून ठेवले आहेत. यात जी के प्रधान, डॅाक्टर धनेश्वर, ज्ञाननाथजी रानडे आणि मृणालीनी जोशी यांचा प्रमुख्याने समावेश होतो.
योगीराज म्हणजे येगीयांचा राजा. महाराज अनेकदा ध्यानात समधीअवस्थेत पोहचत. त्यामुळेच त्यांना ब्रम्हाच्या शक्ती प्राप्त होत्या, त्याचीच प्राप्ती म्हणून त्यांना थोड थोडक नव्हे तर तब्बल १५० वर्षांचे देहधारी जीवन ठेवता आलं असाव.
महाराजांच्या शिकवणीच आणि परंपरेच पाईक होण्यासाठीच आज समाधी पश्चात ७७ वर्षे लोटली असली तरीही शंकर भक्त भजन , नामसंकिर्तन आणि अन्नदान करून महाराजांचा समाधी सोहळा मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात.
मठात आलेल्या सर्व भक्तांना वर्षभर दिवसातील १६ तास अव्याहत मुगडाळ खिचडीचा वाटप सुरू असतो. याव्यतिरिक्त संपुर्ण सप्ताहात दररोज संध्याकाळी अत्यंत लडिवाळ पणे सर्वांना आमरस ते बालूशाहीसह पुर्ण महाप्रसादाचा वाटप होतो.
सातही दिवस अखंड विण्या सोबतच दिवसा अनेक भजनी मंडळे आपापली सेवा रूजू करतात.
गेली ७७ वर्षे या समाधी सोहळ्यात अनेक दिग्गज भारतरत्न व पद्म पुरस्कार प्राप्त कलाकारांनी गायन सेवा रूजू केली आहे. यंदाचे वर्षीही सप्ताहात शास्त्रीय ऊपशास्त्रीय गायन आणि किर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
७३ वा आणि ७४ समाधी सोहळा कोरोना संचारबंदीच्या कात्रीत सापडला आणि मठाचे निवडक सेवेकरी व विश्वस्त अशा मोजक्या जणांच्या ऊपस्थितीत पार पडला. तेंव्हा सोहळा पार पडणे आणि साजरा होणे यात नक्की फरक तो काय हे उमगले. लाखो भक्तांच्या मांदियाळीत समाधी सोहळा होतो तेंव्हाच तो सर्वार्थाने साजरा होतो.
तेंव्हा चलातर सप्ताहात एक दिवस तरी हजेरी लाऊन अलौकिक अनुभूतीला प्राप्त होऊ, धनकवडीला जाऊ.
🙏जय शंकर 🙏
लेखक
सुरेंद्र वाईकर
विश्वस्त, श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंर महारज समाधी ट्रस्ट, पुणे
टिप्पणी पोस्ट करा