पुणे : शिक्षण हा महत्त्वाचा घटक असून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाशिवाय दुसरे ज्ञान देण्याची आवश्यकता आहे.मात्र,सध्या बहुजनांना विविध मुद्यांवर झुंजत ठेऊन त्यांना शिक्षण देणारी व्यवस्था उध्वस्त करण्याचे काम येथील उद्योजक व सत्ताधारी करत आहेत. सवंग घोषणा करून फुकट पैसे वाटल्यामुळे कल्याणकारी राज्याची निर्मिती होऊ शकत नाही.यांचा त्यांना विसर पडला आहे.त्याचप्रमाणे सध्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, सर्वांनी बहुजनाच्या मोफत, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एकत्र यायला हवे, असे मत कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार उल्हास पवार यांनी केले.

महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखीन काम करणाऱ्या व्यक्तींना उल्हास पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे अध्यक्ष सुनील माने, सचिव शिवाजी खांडेकर, संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद गोरे, सुखादेव कंद , संजय धुमाळ, प्रसन्न कोतुळकर, संगीता पाटील, विकास दांगट उपस्थित होते.



उल्हास पवार म्हणाले, सध्याच्या शिक्षण पध्दतीत अनेक बदल झाले आहेत. पूर्वी विद्यार्थी शाळेत स्वावलंबनाचे धडे गिरवत होते.कार्यानुभवातून प्रत्यक्ष ज्ञान मिळवत होते. परंतु, सध्या विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानात अडकले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे शिकवले गेले पाहिजे. तसेच शिक्षकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही शोकांतिका आहे.शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.बालभारतीमध्ये अनेक वर्षांपासून भरतीच झाली नाही.गेल्या काही वर्षात बहुजनांना शिक्षण देणाऱ्या योजना व व्यवस्था उध्वस्त करण्याचे काम केले जात आहे.

डॉ. विजय खरे म्हणाले, केवळ शिक्षकच नाही तर शिक्षकेतर यांचा ही सत्कार झाला पाहिजे. गेल्या काही वर्षात गावकुसाबाहेरील लोक शिक्षण घेऊन प्रश्न विचारू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची दारे बंद करून त्यांच्यावर हा हल्ला केला जात आहे. युरोपियन देशातील सर्वात जास्त आनंदी असणाऱ्या देशांची स्थिती पाहिली तर गेल्या २०० वर्षात या देशांनी संशोधन क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. कारण युरोपातील शिक्षण पद्धती ही अत्यंत चांगली आहे. येथील बालकांना १४ वर्षांनंतर घरी राहता येत नाही. त्यांच्या करिअरसाठी शासनाकडून सर्व खर्च उचलला जातो. भारताला विश्वगुरू व्हायचे असेल तर शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे.

शिवाजी खांडेकर यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा आढावा घेतला. तसेच शाळेत ताई, काका, मामा नसल्यामुळे बदलापूरसारख्या घटना घडत असल्याने शासनाने कंत्राटी कर्मचारी पद्धती रद्द करून कायम पदे भरावीत,अशी भूमिका बोलून दाखवली.टीईटी सारख्या प्रश्नावर मार्ग निघाला नाही तर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याबरोबरच आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार खांडेकर यांनी व्यक्त केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने