भारतातील एकमेव फाउंटन पेन शोमध्ये देश-विदेशातील नवीन व दुर्मिळ पेन पाहण्याची संधी


पुणे : फाउंटन पेनवर विशेष प्रेम असणाऱ्या मंडळींना भारतातील एकमेव फाउंटन पेन शो म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘द पुणे फाउंटन पेन शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. द इंक अँड पेन्स यांच्यातर्फे येत्या २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन फर्ग्युसन रोडवरील ज्ञानेश्वर पादुका चौकातील वन प्लेस या ठिकाणी करण्यात येणार आहे. देश-विदेशातील पेन्सच्या बरोबरच विविध रंगातील शाई, फाउंटन पेनच्या ऍक्सेसिरीज या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.


२६ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिलीप कर्णिक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष मनोज खत्री उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.३० ते संध्याकाळी साडेआठ अशी राहणार असून ते सर्वासाठी विनामूल्य असणार आहे.

द पुणे फाउंटन पेन शो या प्रदर्शनाचे यंदाचे पाचवे वर्ष असून त्यामध्ये तुम्हाला फक्त फाउंटन पेन (शाईपेन) पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनात लॅमी, पेलिकन, वॉटरमन, पारकर, पायलट या कंपन्यांचे फाउंटन पेन पाहता येतील. त्यामध्ये बॉलपेन, रोलरपेन असे कोणतेही पेन्स उपलब्ध राहणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. या प्रदर्शनात भारतीय आणि विदेशी बनावटीची नवीन आकर्षक आणि दुर्मिळ शाई पेन्स, उच्च प्रतीच्या विविध रंगातील शाई, शाई पेन्ससाठी वापरण्यात येणारे सुटे भाग पाहता येतील. यंदाच्या वर्षी लोटस पेन्सचे अरुण सिंघी यांनी तयार केलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्यावरील पेनची स्पेशल एडिशन या प्रदर्शना दरम्यान पेन प्रेमींना पाहता व खरेदी करता येणार आहे. त्याच बरोबर जुन्या पेनची दुरुस्ती करण्याची सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपले हस्ताक्षर कसे सुधारायचे याचे मार्गदर्शन देखील या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे द इंक अँड पेन्सच्या संचालिक रश्मी नगरकर-पिल्ले यांनी सांगितले.

फाउंटन पेन शो मध्ये १०० रुपयांपासून ते पुढे पेन उपलब्ध असतील. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वय वर्षे १० पासून ते जेष्ठ नागरीकांना यामध्ये भाग घेता येईल. सहभाग घेणाऱ्या मंडळींनी घरून शाईच्या पेनाने भारताचे राष्ट्रगीत (जन गण मन) लिहून आणायचे आहे आणि प्रदर्शनात जमा करायचे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा निकाल सात नोव्हेंबर रोजी जागतिक फाउंटन पेन दिनी जाहीर करण्यात येणार आहे.





सुंदर हस्ताक्षर असेल तर व्यक्तीमत्व उत्तम बनते. मुलांमध्ये देखील बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते, विद्यार्थ्यांमध्ये शाईपेनाबाबत जागरूकता वाढावी हाच उद्देश ठेवून गेल्या पाच वर्षांपासून या पेन शोचे आयोजन करण्यात येत आहे. अनेक शाळांनी मुलांना शाईच्या पेन वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. अलीकडच्या काळात लोकांमध्ये शाईच्या पेनबाबत चांगली जागरूकता येऊ लागली आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या पेन शोचा त्यांना नक्की फायदा होत असल्याचे रश्मी नगरकर-पिल्ले यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने