पुणे : पेशवेकालिन सरदार मुजुमदार गणेशोत्सव येत्या रविवारपासून (२४ आॅगस्ट) भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून सुरूवात होत आहे. यंदा उत्सवाचे ३११ वे वर्ष आहे. पुण्यातील कसबा पेठेत सरदार मुजुमदार वाड्यात १७१४ पासून अव्याहतपणे धार्मिक प्रथापरंपरेनुसार गणेशोत्सव अतिशय उत्साहात ऋषिपंचमीपर्यंत साजरा करण्यात येतो. अशी माहिती अनुपमा मुजुमदार यांनी दिली.
भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते ऋषिपंचमी पर्यंत सरदार मुजुमदार गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा रविवार (24 आॅगस्ट) ते गुरूवार (28 आॅगस्ट) पर् पर्यंत हा गणेशोत्सव साजरा होईल. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला रविवारी (24 आॅगस्ट) सरदार मुजुमदार वाड्यात गणेश महलात मयूरासनावर वल्लभेष गणपती स्थानापन्न होईल.
अनुपमा मुजुमदार म्हणाल्या की, नारो नाळकंठ उर्फ आयाबा मुजुमदार यांना १७१४ मध्ये कर्हा नदीमध्ये नर्मदेय गणपतीची मूर्ती सापडली. तेंव्हापासून त्यांनी १७१४ मध्ये गणेशोत्सव सुरू केला. त्यावेळच्या खर्चाच्या कागदपत्रांवरून हे स्पष्ट होते. यंदा उत्सवाचे ३११ वे वर्ष आहे. उत्सवात पाच दिवस श्रीगणेशासमोर कीर्तनकार कीर्तनसेवा अर्पण करतात. दररोज सकाळी सनई वादन असते. सायंकाळी कीर्तन असते. श्रींची मूर्ती दशभूज असून, पंचधातूची आहे. श्रींच्या डाव्या मांडीवर त्यांची पत्नी वल्लभा बसलेली आहे. म्हणून त्यास वल्लभेष गणपती म्हणतात.यंदा रविवारी (२४ आॅगस्ट) सकाळी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत श्रींची मूर्ती मयूरासनावर स्थानापन्न होईल. दररोज सायंकाळी ५ ते ६ कल्याणी नामजोशी यांचे प्रवचन होईल.
सायंकाळी (२४ आॅगस्ट) ६ ते ८ पुंडलिकबुवा हळबे यांचे कीर्तन होईल. सोमवारी ( २५ आॅगस्ट) दुपारी साडेतीन ते साडेचार निनाद ग्रुपतर्फे गायनसेवा होईल. त्यानंतर ६ ते ८ श्रेयसबुवा बडवे यांचे कीर्तन होईल. मंगळवारी (२६ आॅगस्ट) ६ ते ८ वासुदेवबुवा बुरसे यांचे कीर्तन होईल. बुधवारी (२७ आॅगस्ट) ६ ते ८ सुहासबुवा देशपांडे यांचे कीर्तन होईल. गुरूवारी (२८ आॅगस्ट) ६ ते ८ विकासबुवा दिग्रसकर आणि रात्री ८ ते १० सुहासबुवा देशपांडे यांचे तीर्थप्रसादाचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होईल.
टिप्पणी पोस्ट करा