१२ व १३ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय श्रीमती जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन
पुणे : राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पुण्यात येत्या १२ व १३ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय श्रीमती जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिवशी टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे सायं ५ वाजल्यापासून सदर महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील अशी माहिती आयोजकांच्या वतीने कळविण्यात आली आहे.
श्रीमती जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनाने होईल. पाटणकर आणि त्यांचा शिष्यवर्ग वेदवती परांजपे, आदिती नगरकर या ‘ख्याल आणि नाट्यगीत’ या संकल्पनेवर आधारित सादरीकरण करतील. यानंतर मां अन्नपूर्णा देवी यांचे शिष्य व मैहर घराण्याचे मुंबई स्थित प्रसिद्ध बासरीवादक पं. नित्यानंद हळदीपूर यांचे बासरीवादन रंगेल. यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेले सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे यांनी गायलेल्या नाट्यसंगीताची अनुभूती उपस्थितांना घेता येणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप कथक नृत्यांगना माधुरी आपटे आणि समूह यांच्या ‘कथकनृत्यातून नाट्यसंगीताचा वेध’ या कार्यक्रमाने होईल. पहिल्या दिवशी भरत कामत, राहुल गोळे, अंशुल प्रतापसिंग, माधव लिमये, अविनाश पाटील हे कलाकार साथसंगत करतील तर शोभा कुलकर्णी या पहिल्या दिवसाचे सूत्रसंचालन करतील. पहिल्या दिवशी श्रीमती जयमाला शिलेदार यांवर एक चित्रफीत देखील दाखवण्यात येणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी, सायं ५ वाजल्यापासून गोविंद बल्लाळ देवल लिखित, मराठी रंगभूमी - पुणे निर्मित आणि दीप्ती भोगले दिग्दर्शित ‘संगीत संशयकल्लोळ’ हे संगीत नाटक रसिकांना पाहता येणार आहे. या नाटकामध्ये चिन्मय जोगळेकर, भक्ती पागे, सुदीप सबनीस, अनुपमा कुलकर्णी, अपर्णा पेंडसे, विद्यानंद देशपांडे, निनाद जाधव, श्रद्धा सबनीस हे कलाकार असतील तर लीलाधर चक्रदेव व अभिजित जायदे हे कलाकार साथसंगत करतील. रवींद्र कुलकर्णी व लक्ष्मण पाटील यांनी या नाटकासाठी संगीत मार्गदर्शन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा